|
|

उद्योगात शेतकर्यांना हिस्सेदार करण्यासाठी कायदा आणणार - विलासराव देशमुख सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०
उद्योग व्यवसायाकरीता शेतकर्यांची जमीन घेतेवेळी त्यांना उद्योगात हिस्सेदार करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी केले.
बुलडाणा येथील श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्थेच्या राजीव गांधी सैनिकी शाळेच्यावतीने सोमवारी विविध क्षेत्रातील उद्यमशील महिलांचा श्री. देशमुख यांच्या हस्ते सावित्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल मारपकवार, चिंतन ग्रुपचे प्रमुख अभिनंदन थोरात, पत्रकार राजू परुळेकर, आमदार सर्वश्री दिलीपकुमार सानंदा, विजयराज शिंदे, राहुल बोंद्रे, माजी आमदार डॉ. राजेंद्र गोडे, संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ माळी, विद्याताई माळी आदी उपस्थित होते.
उद्योग वाढल्याशिवाय बेकारी दूर होणार नाही, असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, उद्योगासाठी लागणारी जमीन शेतकर्यांशी चर्चा करुनच घ्यावी. उद्योग उभारणीतून शेतकर्यांना फायदा झाला पाहिजे. उद्योगासाठी लागणार्या सुविधा देण्याकरीता केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
सन २०१२ पर्यंत महाराष्ट्र वीज भारनियमन मुक्त करण्यासाठी विद्युत प्रकल्प उभारणीकरीता केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारला प्राधान्याने मदत केली जाईल, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील उद्यमशील महिलांना एकत्रित करुन सामाजिक बांधिलकेच्या भावनेने सावित्री पूरस्कार देण्यासाठी विश्वनाथ माळी यांनी पुढाकार घेतल्याबद्दल श्री. देशमुख यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी जयश्री खाडीलकर, शालीनीताई विखे पाटील, आमदार प्रणिती शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती/प्रशासन) श्रध्दा बेलसरे-खारकर, डॉ. जया व्दादशीवार, प्रा. निशा शेंडे-पावडे आणि चंदाराणी कोंडाळकर या महिलांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल श्री. देशमुख यांच्या हस्ते साडीचोळी, ११ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कारामुळे बचत गटाच्या माध्यमातून काम करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे, असे सत्काराला उत्तर देताना प्रणिती शिंदे यांनी सांगितले. चंदाराणी कोंडाळकर, शालीनीताई विखे पाटील यांनी महिलांचे प्रश्न मांडले. तर श्रध्दा बेलसरे-खारकर यांनी पुरस्कारातून मिळालेल्या ११ हजार रुपयांत स्वत:चे ११ हजार रुपये समाविष्ट करुन एकूण रकमेचे सैनिकी शाळेत नेमबाजी स्पर्धेत प्रथम येणार्या विद्यार्थ्यास त्यांच्या आईच्या नावाने पारितोषिक देण्याचे जाहिर केले.
जयश्री खाडीलकर यांनी बेकारी, विद्यार्थी आत्महत्या, ज्वारी पासून दारु या विषयावर प्रकाश टाकला. डॉ. जया व्दादशीवार यांनी नक्षली भागातील शिक्षणाचे प्रश्न मांडले. समाजाने अशा भागात शिक्षणासाठी संरक्षण दिले पाहिजे तरच सावित्रीबाई यांच्या कार्याचा वसा पुढे नेता येईल, असे त्यांनी सांगितले. प्रा. निशा शेंडे-पावडे यांनी दलितांना सन्मानपूर्वक जगण्याची संधी मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रफुल्ल मारपकवार, राजू परुळेकर, अभिनंदन थोरात यांचीही यावेळी भाषणे झाली.
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
|
|